उद्वर्तन अर्थात उटणे लावणे. सध्या आपल्याला उटणं म्हणजे फक्त दिवाळीत वापरण्याची गोष्ट म्हणून माहित आहे. परंतु मालिश करण्यासारखीच उटणं लावणं ही नियमित करण्याची गोष्ट आहे. मालिश केल्यानंतर आंघोळीच्या वेळी उटणं लावून स्वच्छ आंघोळ करावी. विशेषत: ज्यांना जास्त घाम येतो - त्यामुळे त्वचेला सतत चिकटपणा असतो, घामाला दुर्गंध येतो, चरबी जास्त आहे, कफाचे त्रास वारंवार होत असतील तर आवर्जून नियमित उटणे वापरावे. उटाण्याच्या वापराने त्वचा उजळते तसेच पोतही सुधारतो. ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनी मात्र वैद्यांच्या सल्ल्याशिवाय उटण्याचा वापर करू नये.