नोकरी करणाऱ्या स्त्रिया आणि सगर्भावस्था

Bhardwaj Ayurved    18-Apr-2022
Total Views |


Working women and pregnancy
 
“आपली खरी संपत्ती कोणती?” या प्रश्नाचे उत्तर बहुतेक बुद्धिवंतांकडून “स्वतःचे स्वास्थ्य आणि निरोगी, निर्व्यंग, दीर्घायुषी, गुणी, अपत्य” हेच मिळेल. आजच्या एकच अथवा दोनच अपत्ये असण्याच्या काळामध्ये ही दुसरी संपत्ती जिथे निर्माण होते त्या गर्भिणीच्या शरीराला, तिच्या स्वास्थ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. बीजारोपणापासून ते सर्वांगपरिपूर्ण असा जीव जन्माला येईपर्यंत त्याची संपूर्ण जडण-घडण तिच्या गर्भाशयात होत असते आणि तिने या काळात सेवन केलेले आहार, विहार आणि मानस भाव यांचा या जडणघडणीत खूप मोलाचा वाटा असतो. गर्भावस्थेमध्ये या गर्भाची परिपूर्ण वाढ हेच एकमेव उद्दिष्ट असायला हवे. आजही अनेक घरांमध्ये, कुलांमध्ये, जातींमध्ये आणि धर्मांमध्ये गर्भिणीच्या आहार-विहार-विषयक परंपरा आग्रहपूर्वक जपल्या जातात. परंतु बदलत्या काळाच्या प्रवाहाबरोबर स्त्रिया अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या. अर्थार्जन ही ज्यांची संसाराची गरजच आहे, अश्या स्त्रियाही संख्येने जास्त आहेत. प्रसवकाल अगदी जवळ येईपर्यंतही नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्याही अनेक स्त्रिया असतात. यामध्ये मला एक मोठा स्पेक्ट्रम दिसतो. रोजंदारीवर, शेतात, बांधकामावर काम करणाऱ्या महिलांपासून ते एअरकंडिशन्ड ऑफिसमधील कर्मचाऱ्यांपर्यंतचा. नेमस्त वेळेत, नेमस्त काम असणाऱ्या स्त्रियांपासून ते कामाच्या वेळेला, तासांना बंधन नाही, दिवस-रात्रीचा ही तमा नाही, कामाच्या प्रमाणालाही मर्यादा नाहीत अश्या स्थितीत काम करणाऱ्या महिलाही आहेत. मनावर अजिबात ताण न येणारे हलके शारीरिक काम करणाऱ्या महिलांपासून आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील व्यवस्थापनात, प्रचंड ताण असणाऱ्या पदांपर्यंत महिला काम करतात. यातील काय बरोबर, काय चूक हे सांगणे सोपे आहे; पण जे बरोबर आहे त्यानुसार निर्णय घेणे निश्चितच सोपे नसते. अर्थार्जनाच्या पूर्ण कालावधीसाठी जरी हे अवघड असले तरीही आपण जेव्हा एका सर्जनाची जबाबदारी स्वतःहून स्वीकारलेली असते तेव्हा तेवढ्या कालावधीकरता तरी या गर्भासाठी जे जे शक्य ते ते सारे करायलाच हवे.
 
या काळात सेवन करावयाचा आहार हा द्रवप्राय व मधुर, अम्ल रसप्रधान असावा. लोणी, तूप व दूध हे पदार्थ नित्यसेवनात असावेत. कामाच्या ठिकाणी न्यावयाच्या डब्यातही तूप-साखर, लोणी-साखर अवश्य असावे. घरी असताना जितकी आहाराची काळजी घेतली जाते, त्यातील शक्य तितकी सगळी काळजी कामाच्या ठिकाणी घेतली जावी. घरी केलेले, चांगले विचार मनात आणून तयार केलेले ताजे अन्न सेवन करावे. कोरडे, शिळे, आंबलेले अन्न खाऊ नये. आवडीचे तरीही आरोग्यपूर्ण जेवण असावे. रोजच्या आहारात खीर, वरण, भात, तूप, भाजी, पोळी, आमटी, ताक, लोणी अश्या पदार्थांचा समावेश असावा. शिवाय गर्भिणीच्या आवडीचे किंवा तिला खावेसे वाटणारे पदार्थही जरूर द्यावेत. पदार्थ पदार्थांचे उत्कृष्ट रंग, वास, चव, स्पर्श, शब्द हे गर्भाच्या इंद्रियांचेही उत्तम पोषण करतात हे लक्षात असू द्यावे. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या भोजन अथवा उपाहारगृहाच्या सोयीचा लाभ अगदीच अपरिहार्य परिस्थितीतच घ्यावा. स्वतःबरोबर उकळून थंड केलेले पाणी, डाळिंबाचे दाणे, आवळा सरबत अश्या गोष्टी अवश्य ठेवाव्यात. जेवणाव्यतिरिक्त भूक जाणवल्यास खाण्यासाठी दुसरा एखादा डबाही बरोबर असावा. साजूक तुपातील मुगाचा लाडू, साळीच्या लाह्या, सुके अंजीर, खडीसाखर, मनुका, जर्दाळू, बेदाणे, डाळिंबाचे दाणे, एखादे स्वच्छ धुऊन नेलेले फळ (पपई आणि अननस सोडून) उपयुक्त ठरते. कामाच्या ठिकाणी सहकारी महिलांशी असणारे मैत्रीपूर्ण संबंध हेही ही मानसिकता चांगली राखण्यात खूपच मदत करतात. अनेक गर्भिणींनी मला त्यांच्या ऑफिसमधील मैत्रिणींनी स्वतः घरून आवडीचे पदार्थ करून आणल्याचे सांगितले आहे. डोहाळे इतक्या छान पद्धतीने पूर्ण होत असतील, तर तेही नक्कीच स्वागतार्ह आहे.
 
भूक लागली असतानाही न खाणे हेही चुकीचे आहे. त्यामुळे जेवणासाठी भुकेची वेळ टळून गेल्यावर लंच टाईम पर्यंत थांबून जेवणे अयोग्य ठरते. अश्या वेळी व्यवस्थापनाशी बोलून या गोष्टी वैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यक आहेत हे पटवून देऊन वेळांमध्ये बदलाची परवानगी नक्की मिळवून घ्यावी.
 
कामाची जाग दररोज स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास तेथेही रोज धूप अथवा सुगंधी उदबत्ती लावावी. परिधान करावयाची वस्त्रे तसेच सुती व सैलसर असावीत. सौम्य रंगांची, आल्हाददायक असावीत. लाल इ. भडक रंगाची असू नयेत.. छातीवर अथवा ओटीपोटावर ताण येणारी असू नयेत. बसण्याचे आसन अथवा खुर्ची फार उंच किंवा कठीण असू नये. अनेक ठिकाणी खुर्चीची उंची बदलता येते अश्या वेळी ती आपल्या गुडघ्याइतक्या उंचीची असेल असे पाहावे. अन्यथा पायाखाली एखादे छोटे स्टूल अवश्य ठेवावे. पाय लोंबकळत राहू नयेत. खुर्चीवर व पाठीच्या मागे आरामदायी उश्या असाव्यात. व्यवस्थापनात नसल्या तरी या सोयी व्यक्तिगत पातळीवर करता येऊ शकतात. शरीराची स्थितीही विषम असू नये. सलग अनेक तास उभे राहू नये.
 
शरीरामध्ये मल, मूत्र आणि वायू यांचे नैसर्गिक वेग उत्पन्न होत असतात. कामाचे ठिकाणी व्यग्रतेमुळे, जबाबदारीमुळे, सोयींच्या अनुपलब्धतेमुळे किंवा लाज वाटूनही अनेकदा हे वेग रोखले जातात. असा ‘वेगावरोध’ नक्की करू नये. पुरेशी माहिती न घेता अयोग्य व्यायामप्रकारही अनेकदा केले जातात, तेही टाळावेत. सगर्भावस्थेच्या महिन्यांनुसार वेगवेगळी आसने योगतज्ञ सांगतात. ती आसने सुद्धा तज्ञांकडून शिकून घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे श्रेयस्कर ठरते.
 
जाता-येताना वाहनाचा वापर शक्यतो टाळावा. किमानपक्षी शरीराला खूप हादरे बसणाऱ्या वाहनातून, खडबडीत रस्त्यावरून, जास्त वेगाने जाणे निश्चितच करू नये. दुचाकी वाहन चालवणे, किक मारणे किंवा वाहन बंद पडल्यास ढकलत नेणे हे नक्कीच करू नये. गर्दीमध्ये बसणाऱ्या धक्क्यांनी आघात होऊन सुद्धा अनेकदा आपत्ती ओढवते. जड ओझेही उचलू नये.
 
योग्य वेळी व पुरेशी विश्रांती ही या काळात सर्वात गरजेची असते. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणे हेच योग्य. सध्या अयोग्य काळी झोपणे आणि अयोग्य काळी जागणे हा तर संगणक क्षेत्रातील नित्यक्रम होऊन बसला आहे. हे निश्चितच टाळले पाहिजे.
 
गर्भिणीने स्वतःचे मन प्रसन्न ठेवावे. त्यासाठी आपल्या इष्टदेवतेचे चिंतन, अलंकार धारण, सुगंधी फुले अथवा गजरे यांचे धारण, कस्तुरी, चंदन, कापूर यांच्या उटीचा वापर अवश्य करावा. या काळात संताप, दुःख, भीती, उद्वेग उत्पन्न होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी अथवा ग्राहकांशी वादविवाद, भांडणे टाळायला हवे. अनेकदा कामाचे स्वरूप किंवा तेथील वातावरण आणि सहकार्‍यांशी किंवा वरिष्ठांशी असणारे संबंध यांच्यामुळे या गोष्टी निर्माण होत राहतात. याचे गर्भावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन कामाचे ठिकाण अथवा स्वरूप वेळीच बदलून घेणे हेही आवश्यक ठरते. जसे की - एखाद्या बँकेतील स्त्रीला काऊंटरवरील गर्दी वाढल्याने येणारा ताण किंवा रोख रक्कम सांभाळण्याचा ताण या गोष्टी टाळता येऊ शकतात; किंवा संगणक क्षेत्रामध्ये dead line च्या ताणापेक्षा इतर अतिरिक्त वेळाची अपेक्षा नसणारी कामे कमी ताणाची ठरू शकतात.
 
मूल जन्माला अल्यावर त्याची प्रत्येक बारीकसारीक गरज पुरवण्यासाठी पालक जिवाचे रान करतात. मात्र या ऩऊ महिन्यांच्या कालावधीत त्याच्यासाठी आपण काय केले पाहिजे, काय टाळले पाहिजे याबाबत बरेच अज्ञान दिसते. वरील सर्व टाळावयाच्या बाबी आपण नोकरी करतो त्याचा परिणाम म्हणून उद्भवतात का याकडे थोडे बारकाईने पाहायला हवे. चुकीच्या गोष्टींचे परिणाम गर्भावर होऊन अकाली गर्भस्राव, गर्भपात, अयोग्य काली प्रसूती यापैकी काही उद्भवू शकते. म्हणून काम चालू ठेवणे नक्की आवश्यक आहे का, या काळासाठी पगारी अथवा बिनपगारी रजा मिळू शकते का, कामात काय सवलती मिळू शकतात (जसे की घरून काम, अर्धवेळ काम, कामाच्या स्वरूपात बदल, इत्यादी), कुटुंबातील ज्येष्ठ स्त्रियांची काय मदत मिळू शकते या सगळ्याचा गांभीर्याने विचार केला जायला हवा.
 
नुकत्याच आलेल्या कोरोनाच्या आपत्तीने आपल्याला हे शिकवलेच आहे की आयुष्यातील काही महिने आपण घरातच राहिलो तर काही इकडचे जग तिकडे होत नाही उलट आपले स्वास्थ्य टिकूनच राहते. इथे तर आपल्याबरोबरच आपल्यावरच अवलंबून असणाऱ्या, आपलाच अंश असणाऱ्या आणखी एका जीवाच्याही आयुष्याचा प्रश्न आहे, त्याला प्राधान्य हे द्यायलाच हवे.
 
वैद्य सौ. स्वाती कुलकर्णी, पुणे
एम्. डी.(आयु), पी.एच्.डी.(आयु)